पुणे :नैसर्गिक आपत्ती, दंगल, बंद यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जाणे सर्वमान्य झाले आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची अजब घटना पुण्याजवळील वाघोलीत घडली आहे. वाघोलीतील लेक्सीकॉन शाळेने वाहतुक कोंडीचे कारण देत काल (दि.२७) रोजी शाळेला सुट्टी जाहीर केली होती.
वाघोलीचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेकदा या परिसरात श्रावणी सोमवारी वाहनांच्या रांगा लागतात. या मंदिराच्या अगदी जवळ लेक्सीकॉर्न शाळा असून शाळेत सुमारे ३५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ने- आण करण्यासाठी ३५ स्कुलबस आहेत. मागील सोमवारी (दि.२०) रोजी अनेक विद्यार्थी सुमारे तासभर वाहतूक कोंडीत अडकले होते. मागील आठवड्याचा अनुभव लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने रविवारी संध्याकाळीच पालकांना शाळेच्या सुट्टीची कल्पना दिली.
स्थानिकांचा वेगळा आरोप
ही सुट्टी देऊन शाळा प्रशासनाने खोडसाळपणा केला असून त्यांना वाहतूक कोंडीचे कारण देऊन वेगळा कार्यक्रम घ्यायचा होता असा आरोप स्थानिकांनी केला आहे. वाघोलीतील वाहतूक कोंडी कायमची असून शाळेने त्यासाठी सुट्टी देणे न पटणारे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.