लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सिंहगड घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने गडावरील वाहतूक आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जोडून सुट्ट्या आलेल्या असतानासुद्धा सध्या सिंहगड सफरीचा अनेकांना आनंद घेता येत नाही. त्यातच तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच गडावरील वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.सिंहगडावरील खडक ठिसूळ असल्याने व सतत पडणारा पाऊस व धुके यामुळे गडावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सिंहगडाच्या मोरदरी खिंडीत दरड कोसळल्याने रस्त्यावर दगड, माती आली होती.परिणामी काही तास अनेक पर्यटक गडावर अडकून पडले होते. रस्त्यावरील मोठे दगड पडल्याने त्यांना फोडून बाजूला करावे लागणार होते. त्यामुळे वन विभागाने सिंहगडावरील वाहतूक आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून गडावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले.स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण गडावर गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी जातात. या आठवड्यात १५ आॅगस्टबरोबरच पतेतीनिमित्त सुट्टी आहे. मात्र, गडावरील दुचाकी व चारचाकी वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना गडावरील पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही. इच्छा असूनही अनेकांना शनिवार व रविवारी गडावर जाता आले नाही.उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वन विभागाला हवे तेवढे सहकार्य मिळत नाही. मुंबई आयआयटी तज्ज्ञ समितीने गडावरील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही.या अहवालावरून गडाची वाहतूक सुरू करावी का? हे ठरविले जाईल.आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ समितीने गडाची पाहणी केली आहे. मात्र, त्यांचा पूर्ण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पुढील दोन दिवसांत अहवाल प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर गडावरील काम सुरू करण्याचा तसेच गडावरील वाहतूक सुरू करता येऊ शकते का? याबाबत स्पष्टता येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.
सुट्ट्यांचा मोसम; पण सिंहगड बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:39 AM