लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुल असलेल्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत स्पष्टता आली पाहिजे, असे चव्हाण म्हणाल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल, अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
लहान मुलांबाबत प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून ठराविक मार्गदर्शक सूचना सार्वजनिक कराव्यात. या सूचनांमध्ये लहान मुलांना देण्यासाठी मोठ्यांप्रमाणे व्हिटॅमिन सी, झिंक किंवा इतर पूरक गोष्टींचा समावेश असावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्या म्हणाल्या, “शासनाने गरीब वर्गातील मुलांना पोषक आहार पुरवावा किंवा स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्रोत्साहन द्यावे. ० ते १८ वयोगटातील मुलांच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक व्यायामासंदर्भात मार्गदर्शन करावे.”