लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोनापासून होणारा मृत्यदर कमी करण्यासाठी पहिला डोस तातडीने दिला जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. किमान वीस लाख नागरिकांना पहिली लस दिल्यास येत्या जूनपर्यंत मृत्यदर ९० टक्क्यांनी कमी करता येईल, असा दावा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केला आहे.
जिल्ह्यात ७ एप्रिल अखेरीस ५ लाख ९३ हजार १३० पैकी ५ लाख १ हजार ४४६ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १० हजार २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर १.७३ टक्के इतका आहे. लसीकरणाचा वेग वाढविल्यास मृत्युदर नव्वद टक्क्यांनी कमी होईल. त्यासाठी किमान वीस लाख लशींची गरज आहे.
मेहता म्हणाले, सरकारच्या नियमानुसार ४५ वर्षांवरील व्यक्ती लसीकरणास पात्र आहेत. त्या नुसार ३५ लाख नागरीक लसीकरणासाठी पात्र ठरतात. आत्तापर्यंत अकरा लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातील दहा लाख जणांनी पहिली लस घेतली असून, एक लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शहराची लस देण्याची दैनंदिन क्षमता एक लाख आहे. जर वीस दिवसात वीस लाख लोकांना लस दिल्यास, त्यांना त्याचा फायदा होईल.
दुसरी लस दोन ते तीन महिन्यांनी घेतली तर त्याची परिणामकारकता वाढते, असे संशोधन सांगते. तसेच, पहिली लस घेतल्यानंतर लशीची परिणामकारकता ७६ टक्के इतकी आहे. पहिली लस घेतल्या नंतर बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही सारखी आहे. तसेच मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. जर आपण वीस लाख पहिले डोस दिल्यास एक जूनपर्यंत आत्ताच्या मृत्यूदरात ९० टक्के घट करू शकू, असे मेहता यांनी सांगितले.