लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ''आम्ही १२ एप्रिल रोजी लसीचा पहिला डोस घेतला. त्या वेळी फार त्रास झाला नाही. २४ एप्रिलपासून ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास होऊ लागला. २७ एप्रिल रोजी कोरोना चाचणी करण्यासाठी महापालिका केंद्रावर गेलो. मात्र, चाचणी करू नका, पॅरासिटॅमोलच्या गोळ्या घ्या आणि दहा दिवस घरीच विलगीकरणात रहा,'' असा अजब सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्याचे एका नागरिकाने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.
लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर दहा-पंधरा दिवसांनी ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी असा त्रास होत असला तरी चाचणी करून न घेण्याचा अजब सल्ला महापालिकेच्या काही चाचणी केंद्रांवर नागरिकांना दिला जात आहे. चाचणी न करताच औषधोपचार आणि सात गृह विलगीकरण करण्याचा उपाय सुचवला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांसाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्टची महापालिका दवाखाना किंवा केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास नागरिक आता आपणहून तपासणीसाठी पुढे येत आहेत. मात्र, चाचणी करण्याची गरज नाही किंवा आणखी चार-पाच दिवस वाट पहा, असे सांगितल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. असा सल्ला देणे चुकीचे असल्याचे मत वैद्यकतज्ज्ञांनी वर्तवले आहे.
कोव्हिशिल्डमध्ये अँडिनो व्हायरस तर कोव्हॅकसिन लसीमध्ये मृत कोरोना व्हायरसचा वापर केला जातो. लस घेतल्यावर टेस्ट पॉझिटिव्हच येईल, हा निकष शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा आहे. कोणतीही लस घेतली तर शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हायला लागते. त्याला इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात. त्यामुळे दोन-तीन दिवसांत ताप येणे, दंड सुजणे, अंगदुखी असा त्रास जाणवू शकतो. त्या वेळी पॅरासिटामॉलसदृश गोळी घेण्यास सांगितले जाते. मात्र, दहा-बारा दिवसांनी कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास लसीकरणाशी त्याचा संबंध नाही. लक्षणे दिसत असल्यास चाचणी करून घ्यायलाच हवी. चाचणी न करता केवळ औषधे घेण्याचा किंवा विलगीकरणात राहण्याचा सल्ला देणे चुकीचे आहे. काही दिवसांनी संसर्ग वाढला, ऑक्सिजन पातळी कमी झाली तर जबाबदारी कोण घेणार? टेस्ट केली नसेल तर रिपोर्टशिवाय रुग्णालयात जागा मिळणेही अवघड होऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी वेळेत चाचणी करून घेणे आवश्यक आहे.'
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र, संसर्गाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात भरती होण्याचे नगण्य राहते. त्यामुळे आपण लस घेतली म्हणजे कवचकुंडले मिळाली असे मानण्यात अर्थ नाही. कोणताही त्रास होत असल्यास चाचणी करून त्यानुसार उपाययोजना करणे केव्हाही हिताचे ठरते.
डॉ. केयूर देशपांडे, जनरल फिजिशियन