केंद्रांवर लसीकरणाची तयारी
बारामती: शहरासह तालुक्यातील ४५ वयोगटांपुढील ८७ हजार ६२५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापही काही जण लसीकरणापासून वंचित असून त्यांनाही लस देण्यात येणार आहे. दरम्यान, १८ वर्षापुढील सर्वांना १ मेपासून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ३०, तर बारामती शहरात ६ लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शहरात महिला रुग्णालय, शारदा प्रांगणातील नगरपरिषद शाळा या दोन शासकीय लसीकरण केंद्रांचा, तर उर्वरित चार खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले.
डॉ. खोमणे पुढे म्हणाले, मे महिन्याच्या सुरूवातीपासून १८ वर्ष वयोगटांच्या पुढील सर्वांचे लसीकरण करण्याची शासनाने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात १ मे पासून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांवर लस देण्याची संबंधित भागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशिक्षण देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेले लसीकरण आता वेग घेण्याचे संकेत आहेत.
बारामती शहर आणि तालुक्यात एकूण १८ वर्षे वयोगटापुढील ३ लाख ५० हजार ९८३ लोकसंख्या आहे. त्यामध्ये महिला १ लाख ७९ हजार ७१९ आणि पुरूषांची १ लाख ६९ हजार २५८ संख्या एवढी आहे. त्यापैकी ८७ हजार ६२५ नागरीकांना ४५ वर्ष वयोगट आणि कोरोना योद्धांसह एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित २ लाख ६३ हजार ३५८ नागरिकांचे लसीकरण उर्वरित टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
बारामतीत आजपर्यंत ८७ हजार ६२५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. आगामी काळात दररोज ५ ते ६ हजार नागरिकांना लसीकरण करणाचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर लसींची मागणी करण्यात आली आहे. प्रथम आणि द्वितीय लस देण्याचे अंतरासह आवश्यक नियमावली रुग्णालयाकडे प्राप्त झालेली नाही. प्राप्त झालेल्या नियमानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.
दरम्यान, १८ वयोगटापुढील दुसऱ्या लसीसाठी पात्र झालेल्या नागरिकांची संख्या जवळपास ३ लाखांहून अधिक आहे.त्यामुळे लसीकरण वेगाने उरकण्यासाठी लसींचा पुरवठा त्या प्रमाणात होण्याची गरज आहे.प्रशासनाची लसींचा साठा करताना दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अपेक्षित लसपुरवठा मिळविण्याचे देखील प्रशासनासमोर आव्हान आहे.