लोणी काळभोर: गेल्या आठ दिवसांपासून लसीच्या तुटवड्या अभावी बंद असलेल्या लोणी काळभोर येथील केंद्रास जिल्हा परिषदेकडून डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज एकूण ९०० जणांना लस देण्यात आली. यामध्ये मांजरी केंद्रातील ३०० जणांचा समावेश आहे. प्रथमच टोकण पद्धतीचा अवलंब केल्याने आज गोंधळाविना लसीकरण सुरळीत पार पडले.
राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी लस उपलब्धतेबाबत असंख्य अडचणी येत आहेत. तसेच केंद्र शासनाने १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली आहे. परंतू पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्यानेे या वयोगटातील नागरिकही त्रासले आहेत. त्यातच लोणी काळभोर केंद्रात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी गेल्या ८ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने आपल्याला दुुसरा डोस कधी मिळणार ? या विवंचनेेत हे नागरिक होते.
यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आज लसीकरण सुरू होण्यापूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रांगेत ऊभे असलेल्या सर्वांना टोकण दिले. त्यानंतर प्रत्येकाची नोंद करत रक्तदाब तपासणी करून टप्प्या - टप्प्याने आत सोडले. यामुळे गर्दी असूनही कसलाही गडबड गोंधळ झाला नाही. आज लोणी काळभोर येथे ४५ वर्षावरील ५०० जनांना ४५ वर्षाखालील १०० जणांना तर मांजरी उपकेंद्र येथे ३०० नागरिकांना लस देण्यात आली आहे.