लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेने सुरू केलेल्या १६८ केंद्रांवर सोमवारी प्रथमच एकाच दिवशी सर्वत्र लस उपलब्ध झाल्या होत्या. शुक्रवारी (दि. १८) याची पुनरावृत्ती होत असून, महापालिकेने नव्याने मान्यता दिलेल्या दोन केंद्रांसह १७० केंद्रांवर कोविशिल्ड लस टोचणी होणार आहे. तर, १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसही उपलब्ध असेल.
महापालिकेला गुरुवारी राज्य शासनाकडून कोविशिल्डचे ३० हजार डोस मिळाले. त्याचे वितरण गुरुवारीच महापालिकेच्या सर्व म्हणजे १७० केंद्रांवर करण्यात आले. कोव्हॅक्सिन लसीचेही डोस १६ केंद्रांवर प्रत्येकी १०० या प्रमाणात वितरित झाले.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: कोविशिल्ड लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी ४० टक्के लस ऑनलाईन अपॉईन्मेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाईल. तर २६ मार्चपूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ४० टक्के लस ही दुसरा डोस म्हणून उपलब्ध करून दिली जाईल. तसेच उर्वरित २० टक्के लस ही पहिला डोस म्हणून हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणी करून दिली जाईल. लसीकरणाचे बुकिंग करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़
चौकट
२० मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
ज्या नागरिकांनी २० मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन द स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.