पुणे : भारतात सुमारे ४ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘बी’चा, तर ६० लाख ते १.२ कोटी लोकांना हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग झालेला आहे,असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहानपणीच काविळीला प्रतिबंध करता यावा, यासाठी मुलांना जन्मत: हिपॅटायटिस बीविरोधातील लस दिली जाते. एक वर्षाच्या मुलांना हिपॅटायटिस ‘ए’ विरोधातील लसीचा पहिला डोस आणि सहा महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. ‘ए’ विरोधातील लसीचा अद्याप राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश झालेला नाही. हिपॅटायटिस ‘ई’वरील लस अद्याप भारतात उपलब्ध नाही.
सध्या विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. हिपॅटायटिस ए आणि ई या विषाणूंचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नातून होत असल्याने या माध्यमातून साथीचा आजार पसरू नये, यासाठी स्वच्छता, निर्जंतुकीकरण यावर भर देणे आवश्यक असते. हिपॅटायटिसची लागण झालेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोकाही जास्त असतो. अशा परिस्थितीत हिपॅटायटिसच्या रूग्णांनी दर सहा महिन्यांतून एकदा नियमित तपासणी करणे आवश्यक असते. थकवा, मळमळ, उलटया, पोटदुखी, भूक न लागणे, गडद लघवी होणे, सांधेदुखी, त्वचा पिवळसर होणे, सांधेदुखी ही हिपॅटायटिसची लक्षणे आहेत.
-----------------------
कावीळ अर्थात हिपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ची लागण दूषित पाणी आणि अन्नाद्वारे होते. तर, कावीळ ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’चा प्रसार दूषित रक्त, असुरक्षित शारीरिक संबंध यांद्वारे होतो. कावीळ हे यकृताशी संबंधित आजाराचे लक्षण असते. लहानपणीच काविळीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने लसीकरण झाल्यास भविष्यातील धोके टाळता येतात. ‘ए’ ते ‘ई’ या पाच प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळची लागण होते. कोणत्याही प्रकारची कावीळ गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक असते. त्यामुळे हिपॅटायटिसचे निदान होण्यासाठी रक्त तपासणी आवश्यक असते.
- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना
----------------------
ब-याच लोकांना हिपॅटायटिसविषयी माहिती नसते आणि त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. हिपॅटायटिस बी आणि सीची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत आणि नकळत या विषाणूचा प्रसार होतो. वेळीच तपासणी केल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तींची संपूर्ण तपासणी आणि त्यानुसार उपचार केले जातात. हिपॅटायटिसचे निदान रक्त तपासणीतून केले जाते. यामध्ये अँटीबॉडी आढळून आल्यास रक्त नमुन्याची पीसीआर चाचणी करून विषाणू अजूनही अस्तित्त्वात आहेत की नाही आणि रक्तप्रवाहामध्ये किती अस्तित्त्वात आहे हे तपासले जाते.
- डॉ. कीर्ती कोटला, पॅथॉलॉजिस्ट
--------------------
हिपॅटायटिसकडे दुर्लक्ष केल्यास आजार आणखी वाढू शकतो. म्हणूनच, चाचणी करून आणि लवकर उपचार करून घेणे योग्य ठरते. हिपॅटायटिस झालेल्या व्यक्तीला सिरोसिस किंवा कर्करोगाचा त्रास होऊ शकतो. लवकर निदान आणि उपचारामुळे यकृत निकामी होण्यापासून रोखता येऊ शकते.
- डॉ. मुकेश बुधवानी, जनरल फिजिशियन