लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीसह ‘को-विन अॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे, पुणे शहरात १६ जानेवारीपासून १ मार्च २०२१ पर्यंत अपेक्षित लसीकरण न झाल्याने लसीकरणाचा टक्का घसल्याचे दिसून आले आहे़ आत्तापर्यंत एकूण आरोग्य सेवकांपैकी ६० टक्के जणांना तर, फ्रंटलाईन वर्कर्सपैकी सुमारे २५ टक्के जणांना लस देण्यात आली आहे़
दरम्यान, शासनाच्या नवीन आदेशानुसार महात्मा फुले आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांमध्येच लसीकरण होणार असल्याने लसीकरणाचा वेग आणखी मंदावला जाणार आहे़
कोरोना प्रतिबंधक लस देताना पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, दुसऱ्या टप्प्यात कोरोना आपत्तीत काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर्स) यांना, तर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांपुढील अन्य व्याधीग्रस्त व्यक्तींना लस देण्याचे नियोजन आहे़ मात्र या सर्वांना लसीकरणाच्या संगणकीय प्रणालीत नावनोंदणी करणे अत्यावश्यक आहे़
यापूर्वीच्या दोन टप्प्यांत नावनोंदणी केलेल्या व ‘को-विन अॅप’मध्ये नाव आलेल्यांनाच लसीकरणासाठी बोलविले जात आहे़ त्यातच अॅपमधील तांत्रिक अडचणी, नावनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचा नकार यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रारंभीचे लसीकरण अतिशय नगण्य होते़ तद्नंतर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करून ही व्यवस्था २७ ठिकाणी कार्यरत झाली़ यामुळे लसीकरणाचा वेग वाढला गेला़ परंतु, नावनोंदणी केलेल्या ५६ हजार आरोग्यसेवकांपैकी आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ३८ हजार ७७३ जणांच लस दिली गेली़ तर नावनोंदणी केलेल्या ५७ हजार फ्र ंट लाईन वर्कर्स पैकी केवळ १६ हजार २० जणांनी लस घेतली आहे़
पुणे शहरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपर्यंत ५४ हजार ९६३ जणांनाच आत्तापर्यंत लस देण्यात आली आहे़ तर १ मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात पहिल्या दिवशी ६० वरील १५४ जणांना तर ४५ वर्षावरील अन्यव्याधीग्रस्त १६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे़
---