पुणे : पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून सातत्याने लसपुरवठा होत नसल्याने वारंवार बंद पडणाऱ्या लसीकरण मोहिमेला, आता खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू झाल्याने नव्याने उभारी मिळाली आहे़ विशेष म्हणजे १४ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील वर्गाचे बंद पडलेले लसीकरण खासगी रुग्णालयांमुळे पुन्हा सुरू झाले असून, गेल्या दोन दिवसात (शनिवारी व रविवारी) या वयोगटातील १ हजार ५८४ जणांनी लस घेतली आहे़
शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांना शनिवारपासून सिरम इन्स्टिट्यूटकडून थेट लस पुरवठा सुरू झाला असल्याने, गेली दोन दिवस काही ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले आहे़ यामुळे महापालिकेकडे येणाऱ्या तुटपुंज्या लस साठ्याला आता खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचा बूस्टरच मिळाला आहे़ त्यातच नागरिकांना प्रथम लस हवी आहे, मग ती पैसे देऊन का मिळावी अशी आता मानसिकता झाली आहे़ त्यामुळे अनेकांनी पैसे भरून खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे़ त्यातच कुठल्याही वयोगटाची अट नाही, कोविन अॅपवर नोंदणी करून लागलीच लस मिळत असल्याने युवा वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहे़
गेल्या दोन दिवसांत खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ हजार ६८५ जणांचे तर, ४५ ते ५९ वयोगटातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसह खासगी रुग्णांलयामंधील धरून ३ हजार ८५६ जणांना लसीकरण करण्यात आले आहे़ ६० वर्षे वयोगटातील १ हजार ७७१ जणांना लस देण्यात आली आहे़
रविवारचा दिवस असूनही शहरात ६ हजार ८१३ जणांना लसीकरण करता आले असून, यापूर्वी रविवारी कधीही लसीकरणाचा आकडा हजार दोन हजारांच्या पुढे गेला नव्हता़ आजपर्यंत शहरातील सर्व वयोगटातील ९ लाख ५९ हजार ३७६ जणांना लसीकरण झाले आहे़ यातील दुसऱ्या डोसचे प्रमाण साधारणत: तीन लाखांच्या आसपास आहे़
--------------------------
सिरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळण्याची अपेक्षा
सिरम इन्स्टिट्यूटकडे लस मिळविण्यासाठी गेली दोन आठवडे आम्ही बैठका घेऊन पाठपुरावा करत आहे. तसेच सिरमचीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारशीही महापालिकेचा पत्रव्यवहार सुरू आहे. सोमवारी यावर मार्ग निघून, पुणेकरांना सिरमकडून लस कधी मिळेल याचे उत्तर अपेक्षित आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली़
------------------