प्रभाग क्रमांक ३५ मध्ये एकच कोविड लसीकरण केंद्र सुरू असून, त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना लस मिळण्यास विलंब होत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. प्रभागातील लसीकरणाला वेग मिळावा याकरिता पुणे महापालिकेच्या जगताप क्रीडा संकुलात लसीकरण केंद्र सुरू करावे.
या लसीकरण केंद्राचा उपयोग संभाजीनगर, चव्हाणनगर, तळजाई पठार व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना होईल. त्यामुळे याठिकाणी लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे असल्याने सुशांत ढमढेरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख आशिष भारती यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली.
सुशांत ढमढेरे यांनी संबंधित निवेदनाची प्रत पालिका आयुक्त विक्रमकुमार यांना सुद्धा दिली. या वेळी सोबत माजी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी पुणे शहर सरचिटणीस राहुल पोटे, शंकर सहाणे, पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दिगंबर कोबल उपस्थित होते.
फोटो ओळ - क्रांतिसूर्य महात्म्या फुले (तीन हत्ती) चौकातील आप्पा जगताप क्रीडा संकुल येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन देताना सुशांत ढमढेरे, प्रशांत जगताप, राहुल पोटे.