पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. साकुर्डे येथे ही रुग्णांची संख्या वाढत आहे. साकुर्डे ग्रामपंचायतीने याबाबत माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ग्रामस्थांचे सर्वेक्षण सुरू केलेले आहे. याशिवाय साकुर्डे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे दिला होता. आजपासून साकुर्डे येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सरपंच रमेश सस्ते यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, वामन सस्ते, मोहन जाधव, पोलीस पाटील प्रियांका चव्हाण, ग्रामसेवक संजय भोसले, तलाठी धीरज आगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बेलसर प्रथमोपचार केंद्राकडून लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे साकुर्डे उपकेंद्रात लसपुरवठा केला जाणार असून, उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी पौर्णिमा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक सुनीता कोरे, आरोग्यसेविका सत्यभामा म्हेत्रे, आरोग्य सेवक समीर पटेल, आशा स्वयंसेविका वनिता लोंढे, अर्धवेळ परिचारिका आशा भंडलकर,यांनी लसीकरण व्यवस्थेचे नियोजन केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वतःचे विलगीकरण करावे, जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईनची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी पौर्णिमा पांडव यांनी केले आहे.
साकुर्डे येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.