लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडीत महापालिकेचे लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र लसीकरण केंद्राला पुरेशी जागा मिळत नसल्याने अडचण येत होती. अखेर खराडीत यशवंत चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या चार ते पाच दिवसांत ते सुरू होईल.
कोरोनाची रुग्ण संख्या खराडीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. खराडीतील ज्येष्ठ नागरिक आणि आता ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना वडगाशेरीतील महापालिकेच्या रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चाचणी करण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी सांगितले की, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. येत्या चार ते पाच दिवसांत पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू होईल.
चौकट
खराडीत खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ज्येष्ठांना दिवसभर रांगेत बसून राहावे लागते. अनेक वेळा वाद होत आहे. ४५ वयोगटाच्या वरील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करूनही लस मिळत नाही. मात्र ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींना लस लगेच मिळते. लस घेण्यासाठी चकरा माराव्या लागतात. अशी तक्रार नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली
चौकट
खराडीतील रक्षकनगर येथील पालिकेच्या जलतरण तलाव येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथेच स्वॅब तपासणी केली जाते. मात्र दिवसाला केवळ १०० च व्यक्तींची तपासणी होत असल्याने नागरिकांना दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. पहाटे ५ वाजता रांगेत बसावे लागते. पाहिल्या १०० जणांचे स्वॅब घेतले जाते. त्यापुढील व्यक्तींना दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. रविवारी चाचणी होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट
खराडीतील यशवंत चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. कोरोना केंद्रावर सध्या दीडशे चाचण्या करण्यात येत आहेत. हे चाचणी केंद्र शनिवारी किंवा रविवारी या एका दिवशी बंद असते.
- सुहास जगताप, सहआयुक्त, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय