पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेकडे रविवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा न आल्याने, आज (सोमवार दि. ३ मे) शहरातील महापालिकेचरी ११२ लसीकरण केंद्र पूर्णंत: बंद राहणार आहे़ केवळ कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय येथे १८ ते ४४ वर्षांवरील व नोंदणी केलेल्यांनाच सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत नियोजित कोट्याप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे़
शुक्रवारी (३० एप्रिल रोजी) रात्रीच महापालिकेकडील सर्व लस संपल्याने, शहरातील ११४ लसीकरण केंद्रांना लस पुरवठा होऊ शकला नव्हता़ परंतु, राज्य शासनाच्या सूचनेनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यासाठी केवळ कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय या दोन ठिकाणी कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या दोन्ही ठिकाणी ७ मे पर्यंत दररोज सुमारे ३५० लसीकरण होईल अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे़ त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना रविवारी कमला नेहरू रूग्णालयात १९४ जणांना तर राजीव गांधी रूग्णालय येथे १८६ जणांना लस देण्यात आली़
दरम्यान जोपर्यंत महापालिकेला लसीचा आवश्यक साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शहरातील अन्य ११२ केंद्र पूर्णत: बंद राहणार आहेत़ तसेच ज्या दोन ठिकाणी लसीकरण चालू आहे तेथेही केवळ नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाच उपलब्ध कोट्यानुसार लस दिली जाणार आहे़ त्यामुळे राज्य शासनाकडून महापालिकेला लसपुरवठा होण्याची वाट पहावी लागत असून, ही लस आल्यावरच शहरातील अन्य ११२ लसीकरण सुरू होऊ शकणार आहेत़
---------------------------------