काही ठिकाणी नागरिकांना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्याने दुसरा डोस घेताना अडचणी निर्माण होत आहेत. अडचण टाळण्यासाठी नागरिकांनी दोन्ही डोसच्या वेळी समान मोबाईल क्रमांक वापरावा आणि प्रमाणपत्र न मिळाल्यास लसीकरण केंद्रावरील तांत्रिक टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
लस घेतल्यानंतर आपण आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी) किंवा डिजिटल प्रत किंवा लिंक आवर्जून मागितली पाहिजे. खासगी रुग्णालयांमध्ये आपणाकडून घेतलेल्या शुल्कामध्ये याचाही समावेश आहे. आपल्या लसीकरणोत्तर ३० मिनिटांच्या निरीक्षण काळात आपण प्रमाणपत्र मिळण्याची खातरजमा करून घेऊ शकता. ते घेतल्याशिवाय घरी परतू नका. रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले नाही तर १०७५ या टोल फ्री क्रमांकावर त्यासंबंधीची तक्रार लाभार्थी नोंदवू शकतात, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
---------
तांत्रिक त्रुटीमुळे पहिल्या डोसनंतर काही वेळा प्रमाणपत्र जनरेट झाल्याचे दिसत नाही. मात्र, डोस घेतल्यानंतर त्याची नोंद कोविन अॅपवर होत असते. त्यामुळे दुसरा डोस घेताना अडचण येत नाही. तरीही, प्रमाणपत्र न मिळाल्यास केंद्रावरील तांत्रिक टीमशी नागरिकांनी संपर्क साधावा, त्यांना नक्की मदत मिळेल. दोन्ही डोस घेताना एकच मोबाईल नंबर वापरावा.
- सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
-----
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
लसीकरणासाठी नोंद करताना श्क्यतो स्वत:चा मोबाईल नंबर द्यावा. स्वत:कडे नसल्यास अगदी जवळच्या नात्यातील नंबर द्यावा. लसीकरणनंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
----
प्रमाणपत्र डाऊनलोड कसे करावे?
कोविन वेबसाईट किंवा आरोग्य सेतू अॅपवरून प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. कोविन साईटवर आपला नोंदणीकृत क्रमांक भरल्यावर दोन्ही डोसच्या तारखा आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची लिंक दिसते. आरोग्य सेतू अॅपवरील होम स्क्रीनवरील कोविन टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर 'लसीकरण प्रमाणपत्र' पर्यायावर, मग 'प्रमाणपत्र मिळवा' बटणावर क्लिक करावे.