लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या सूचनेनुसार १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना १ मे पासून पुण्यातही लस देण्यात येणार आहे़ मात्र केवळ ३५० भाग्यवंतांनाच लस मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन केंद्रांवरच ही लस मिळणार आहे. मात्र, ३५० जण झाल्यावर लसीकरण सर्वांसाठीच बंद होणार आहे.
लससाठा उपलब्ध झाला नसल्याने, १ मे व २ मे (शनिवार व रविवारी) शहरातील महापालिकेची अन्य सर्व लसीकरण केंद्रे पूर्ण राहणार आहे. सोमवार दि़ ३ मेपूर्वी शासनाकडून लस उपलब्ध झाली तर सोमवारी शहरातील लसीकरण केंद्रे सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
१ मे रोजी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय येथे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच ही लस सुविधा उपलब्ध राहणार आहे़ ज्यांनी लस नोंदणीची साईट सुरू झाल्यानंतर या दोन रूग्णालयांची निवड केली असेल त्यांनाच लस देण्यात येणार आहे़ प्रथम येणाऱ्या ३५० इतक्या लाभार्थ्यांनाच को-विन पोर्टलवर नोंदणी करून रुग्णालय निवडता येणार आहे़ को-विन पोर्टलवर केवळ ३५० जणांचीच दोन ठिकाणी नोंद होणार असून, सदर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉटनुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर जाणे जरुरी राहणार आहे़ नावनोंदणी न करता वरील दोन्ही लसीकरण केंद्रांवर कोणीही थेट जाऊ नये, त्यांना लस मिळणार नाही असेही महापालिकेने सांगितले आहे़
-----------
४५ वर्षांपुढील सर्वांसाठीच लसीकरण केंद्र बंद
शनिवार (१ मे) व रविवार (२ मे ) रोजी ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी असलेली पुणे महापालिकेची इतर सर्व लसीकरण केंद्र लससाठा उपलब्ध नसल्यामुळे पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर या दोन दिवसांत जाऊ नये, असे आवाहनही महापालिकेने केले आहे़
---------------------------