अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावाची लोकसंख्या पंधरा हजारांपेक्षा जास्त आहे. परंतु या तीन गावांसाठी अवसरी बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य समुदाय अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ही तीन पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने ऐन कोरोनाच्या प्रादुर्भावात उपकेंद्र बंद असल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांना अवसरी खुर्द किंवा निरगुडसर, धामणी या गावांमध्ये लसीकरणासाठी जावे लगत आहे. अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांकरिता अवसरी बुद्रुक येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. यासाठी सन २०१४ पासून तत्कालीन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेवतीताई वाडेकर, ग्रामपंचायत सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे हे प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप यश आले नाही.
अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या गावात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण असून दोन महिन्यांत कोरोनामुळे १० ते १२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. वरील गावांमध्ये कोरोना लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यांत फक्त १२५० नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने तालुका आरोग्य विभागाने अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांसाठी दररोज किमान ३०० कोरोना लसीचे डोस पाठवावेत, अशी मागणी अवसरी बुद्रुकचे सरपंच पवन हिले, टाव्हरेवाडी गावचे सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली आहे.
फोटो : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे सहा दिवसांनंतर कोविड लसीकरण चालू झाल्याने ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती.