लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याला मोजक्या प्रमाणात उपलब्ध होण्याऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे लसीकरण संथ गतीनेच सुरू आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक आजही लसीकरणापासून वंचित आहेत. पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्रांना लसीचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे क्षमता असतानाही आरोग्य विभागाला ही मोहीम वेगाने राबविणे अशक्य होत आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य अधिकारी, हेल्थ केअर वर्कर तसेच फ्रंन्टलाईन वर्कर यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षापुढील नागरिक तसेच ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर काही काळ १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचेही लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसींचा पुरवठा कमी झाल्यामुळे या वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले. अनेकांनी पहिला डोस घेतला. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना दुसरा डोस मिळालाच नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. मात्र, लसीचा तुटवडा हा कायम राहिला. लसींचा मोजकाच पुरवठा होत असल्याने ग्रामीण भागात ही मोहीम वेगाने राबिवण्यात गेल्या काही दिवसांपासून अडचणी येत आहेत. जिल्ह्यात ४०७ सरकारी लसीकरण केंद्र आहेत. तर २५ खाजगी लसीकरण केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. रोज ९० हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये आहे. मात्र, लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने मिळालेल्या लसींचे नियोजन करून या केंद्रांना ती वितरित केली जाते. यात अनेक केंद्रावर पुरवठा कमी झाल्याने काही मोजक्याच नागरिकांना लस दिली जाते. अनेक नागरिकांना लस न घेता माघारी फिरण्याची वेळ येते. त्यात कोविन ॲपवर लसीकरणासाठी अपॉइंन्टमेंट घेतानाही अडचणी येत आहे.