स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला : मातेसह बाळाची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत
पुणे : गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. गर्भाच्या विविध अवयवांची वाढ देखील याच काळात होत असल्याने महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मातेला व बाळाला कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी गर्भावस्थेत मातेला फ्लूची लस देणे फायदेशीर ठरू शकते. या लसीकरणामुळे गर्भातील बाळाचेही संरक्षण होते. त्यामुळे महिलांनी फ्लूची लस घ्यायला विसरू नयेत, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
गर्भवती मातांमध्ये फ्लूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. फ्लू झाल्यास दिवस भरण्यापूर्वी कळा सुरू होऊन लवकर बाळंतपणाचा धोका असतो. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. गर्भावस्थेत फ्लूची लस घेतल्यास मातेचे व बाळाचे संरक्षण होतेच; शिवाय, बाळ जन्माला आल्यानंतरही त्याला काही महिन्यांपर्यंत फ्लूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते. फ्लूची लागण झाल्यास गर्भवती मातांना कमी प्रतिकारशक्तीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, ‘गर्भावस्थेत महिलेला फ्लूची लस दिल्यास प्रतिजैविकांच्या रूपात संरक्षणात्मक संरक्षण यंत्रणा विकसित होते. त्यामुळे गर्भातील बाळाचे संरक्षण केले जाते. फ्लूची लस किती सुरक्षित आहे, याबाबतची चाचणी ब-याच वषार्पूर्वी केली गेली आहे. या चाचणी अहवालावरून फ्लूची लस गर्भवती महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.’
----------------------
गर्भावस्थेतील लसीकरणामुळे माता आणि बाळाचे विविध आजारांपासून संरक्षण होते. गर्भवती महिलेने कोणत्या लसी घ्याव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबाबत तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- डॉ. हेमांगी थत्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ
--------------------------
फ्लू किंवा इन्फ्लूएंझाची लस केवळ गर्भधारणेच्या तिस-या महिन्यानंतर दिली जाते. फ्लूची लस घ्यायची असल्यास स्त्रीरोग किंवा प्रसूती तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रूग्णालयात जाणून घेणे योग्य आहे. फ्लू लसीकरण करून घेणा-यांमध्ये गर्भवती महिलांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. हे लसीकरण दोन प्रकारे करण्यात येते. यात इंजेक्शनद्वारे किंवा इन्फ्लूएंझा लस नाकात स्प्रे मारून दिली जाते. गर्भवती महिलांना फक्त ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते.
- डॉ. राजेश्वरी पवार