पुणे : निरामय संस्थेच्या ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ या उपक्रमांतर्गत मागील वीस दिवसांत तब्बल पाच हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग, गतिमंद, अनाथ, तृतीयपंथी, वृद्धाश्रमातील एकाकी वृद्धांसह बेघर, ओळखपत्र नसलेल्यांचा समावेश आहे. अतिरीक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत कामाचे कौतुक केले.
या वेळी निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले, अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, आमदार माधुरी मिसाळ, कार्यकारी विश्वस्त ज्योतिकुमार कुलकर्णी उपस्थित होते. समाजातील उपेक्षित घटकांसह झोपडपट्ट्या, सेवा वस्त्यांमध्ये जाऊन गोरगरिबांना लस देण्यात येत आहे. यासोबतच जागेवरून हलता न येणाऱ्या नागरिकांनाही लस दिली जात आहे.
यासोबतच बौद्ध विहार, साधू वासवानी मिशन, पुणे शहर व्यावसायिक संघटना अशा ठिकाणी जाऊन सर्व बांधवांचे व भगिनींचे लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर ज्यांचा व्यापक संपर्क येतो अशा विविध स्तरातील कष्टकरी, रिक्षावाले, पथारीवाले, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी निरामय संस्था सध्या लसीकरण करत असल्याचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी सांगितले.