कर्मचारी संख्या कमी-विचारणा तपासणी काहीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निर्बंध उठवले असले तरीही शहरातील फक्त २० टक्के हॉटेल सुरू झाली आहेत. बहुतेकांचे कर्मचारी अद्याप गावीच असून जे आहेत त्यातील बहुतेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.
शहरात साधारण ८ हजार हॉटेल आहेत. त्यात सर्व प्रकारचे मिळून दीड लाख कर्मचारी काम करतात. कोरोना टाळेबंदीतील आर्थिक फटका सहन न होऊन त्यातील बरीच हॉटेल बंद पडली. आता निर्बंध उठवल्यानंतरही फक्त २० टक्के म्हणजे साधारण २ हजार हॉटेल सुरू झाली आहेत. त्यामुळे कर्मचारी संख्या मोजकीच म्हणजे साधारण १५ हजार आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के प्रवेशाचे बंधन असल्याने हॉटेल मालकांनी कर्मचारी कमी ठेवले आहेत.
काही हॉटेलमध्ये चौकशी केली असता या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले निदर्शनास आले. बहुसंख्य कर्मचारी परगावचे आहेत. स्थानिक कर्मचाऱ्यांनी किमान एक लस घेतली आहे. परगावचे कर्मचारी लस घेतली असे सांगतात, मात्र प्रमाणपत्र मागितल्यावर त्यांना ते दाखवता येत नाही. सिंहगड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये स्थानिक कर्मचाऱ्याने पहिल्या लसीचे प्रमाणपत्र दाखवले. त्याच हॉटेलमधील परगावचा कर्मचारी मात्र असे प्रमाणपत्र दाखवू शकला नाही.
हॉटेल मालकांनीही कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतलेली नाही. त्यांच्याकडे विचारणा केल्यावर तेही ‘हो, आमचे कर्मचारी लस घेतलेलेच आहे असे सांगतात.’ त्यांची तशी नोंद केली आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नसते. कर्वे रस्त्याच्या कोपऱ्यावरील एका हॉटेलमध्ये असा अनुभव आला. ‘ते काळजी घेतात, आता काही होत नाही,’ असे बेजबाबदार उत्तर मिळाले.
रस्त्यांवर टपऱ्या किंवा हातगाड्यावर खाद्यपदार्थ विक्री होते तिथे तर गर्दीचे कोंडाळेच असते. हिराबाग चौक, ज्ञानप्रबोधिनी, डीपी रस्ता अशा अनेक ठिकाणी मागील काही वर्षात खाऊगल्ल्या तयार झाल्या आहेत. तिथेही मोजक्याच लोकांनी लस घेतलेली आढळली. दोन्ही लसी घेतलेले तर संख्येने कमीच होते. शहरातील जबाबदारी महापालिकेवर, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेवर व यावर नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. मात्र हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी किंवा साधी विचारणा करणारी एकही सरकारी यंत्रणा नाही.
चौकट
शहरातील एकूण लहानमोठी हॉटेल्स- ८ हजार
कर्मचारी संख्या- १ लाख ५० हजार
सुरू झालेली हॉटेल्स- २ हजार
कर्मचारी संख्या- १५ हजार
चौकट
“हॉटेल व्यवसाय आधीच आर्थिक संकटात आहे. आता निर्बंध उठवलेत तर अटी अनेक घातल्या आहेत. आम्ही त्याचे पालन करतो. कर्मचारी कमीच आहेत. त्यांच्या लसीकरणाची खात्री करून घ्यावी, त्यांना त्यासाठी मदत करावी असे हॉटेलचालकांना आम्ही सांगितले आहे. शक्यतो कोणीही लस न घेता काम करणार नाही याची काळजी घेतली जाते.”
-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ॲन्ड हॉटेलिअर्स असोसिएशन