पुणे : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, सर्व नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे़ शासनाच्या सूचनेनुसार सर्वांनी लस घेणे हे गरजेचे आहे़ तरीही अनेक नागरिक लसीकरणासाठी आजही टाळाटाळ करताना दिसत आहे़ परंतु, कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच खूप महत्त्वाचे हत्यार आहे़ कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांसाठी लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले़
बाणेर येथील सर्व्हे नं. १६४ येथील आरोग्य केंद्र येथे पुणे महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे़ या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, डॉ. सागर बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किमया कुलकर्णी, नितीन कळमकर आदी उपस्थित होते़
बाणेर येथे लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पंचवटी, सूस, म्हाळुंगे या गावांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मध्यवर्ती लसीकरण केंद्र उपलब्ध झाले असल्याबद्दल नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी महापालिकेचे आभार मानले़
---------------------------