पुणे : कोरोना प्रतिबंध लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची नोंद ठेवण्यात येणारे केंद्र शासनाचे मुख्य सर्व्हर मंगळवारी सकाळपासून बंद पडले. यामुळे दुपारी एकपर्यंत सर्वच लसीकरण केंद्रावरील लस देण्याची प्रक्रिया पूर्णतः खोळंबली होती.
दरम्यान, दुपारी १ नंतर हे काम मोबाईल ॲपद्वारे काही ठिकाणी सुरू झाल्याने सकाळपासून लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. याबाबत महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र शासनाकडून संबंधित सर्व्हरचे सर्व नियंत्रण असल्याने यात स्थानिक पातळीवर काहीही करता येत नसल्याचे सांगितले गेले.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रत्येक लसीकरण केंद्रांवर नागरिक लस घेण्यास गेले. मात्र, लसीकरण सुरू होत नसल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तर लस उपलब्ध नसल्याची अफवा ही अनेक ठिकाणी उठली गेली. मात्र, लसीकरण नोंद घेणारे सर्व्हर डाऊन झाल्याचे समजल्याने अनेकांनी अखेर घराचा रस्ता धरला. तर काही ठिकाणी थेट उद्याच येण्याबाबत सांगण्यात आले.
काही नागरिकांनी लसीकरणासाठी अगोदरच ऑनलाइन नोंदणी केली असल्याने ते लसीकरण केंद्रांवर थांबून होते. त्यामुळे दुपारी एक नंतर काही ठिकाणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी करून लसीकरण सुरू झाले. दरम्यान, दुपारी 3 नंतर लसीकरण सेवा पूर्ववत झाल्याने, रात्री उशिरा पर्यंत अनेक ठिकाणी लसीकरण करण्याचे काम चालू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.