पुणे : गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरासह ग्रामीण भागातील देखील रुग्णसंख्या चांगलीच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकतात. परंतु आजही पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल २० हजार ६२७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचं लसीकरण (Vaccination) पूर्ण झालं नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शासकीय शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी लसीकरणाकड पाठ फिरलवी आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली तमिळनाडूसह अन्य काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात देखील शाळा सुरू करण्याची मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत देखील याबाबत चर्चा होऊ शकतो. शिक्षण विभागाने राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडे शाळा सुरू करण्याबाबत कोणती खबरदारी घेता येईल, याची विचारणा केली होती.
शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुणे जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुणे जिल्ह्यात शासकीय शाळेत २८ हजार ८९९ तर खाजगी शाळांमध्ये ३१ हजार ३१५ शिक्षक काम करतात. जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या 60 हजार 250 ऐवढी आहे. यापैकी अद्याप ही २० हजार ६२७ शिक्षक व शिक्षकेतर लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही.
ग्रामीणमध्ये ९५ टक्के तर शहरात ५० - ५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण
ग्रामीण भागात शासकीय व खाजगी दोन्ही सुमारे ९५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर शहरी भागात प्रमाण ५० - ५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास पुणे शहरातील अनेक शाळांना शिक्षकांचे लसीकरण अपूर्ण असल्याने अडचण येऊ शकते.