१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लसीकरण मोहीम राबविण्याचे शासनाने ठरवलेले आहे. मात्र, यासाठी खासगी वैद्यकीय क्षेत्राचीही मदत घेतली जाणार आहे त्यासाठी खासगी रुग्णालयांकडून अधिकृत लसीकरण केंद्र मागणी अर्ज मागवलेले आहेत, आज अखेर ११ रुग्णालयांनी त्यांचे मागणी अर्ज सादर केलेले असून सुमारे ४० ते ४५ रुग्णालयांची अधिकृत लसीकरण केंद्रासाठी मागणी येण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृतपणा देताना या हॉस्पिटलमध्ये प्रतीक्षा हॉल, लसीकरण हॉल व लसीकरणा नंतरचा देखरेख हॉल असे तीन हॉल असणे गरजेचे आहे, लसीकरण चालू असताना डॉक्टरची उपस्थिती गरजेची आहे. तसेच एक नोडल ऑफिसर लसीकरणावर देखरेख व नियोजन करण्यासाठी गरजेचा आहे आणि लस दिल्यानंतर, एखाद्या नागरिकाला त्रास झाला तर त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांची पहाणी करून अधिकृत लसीकरण केंद्राची मान्यता देण्यात येईल, असे शासनाचे धोरण आहे, अशी माहिती हवेली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यामध्ये सुरळीतपणा आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाबरोबरच तालुका प्रशासन कार्यरत असून काही अडथळे पार केल्यानंतर येत्या काही दिवसात यामध्ये निश्चित सुधारणा होईल अशी माहिती हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.