नीलेश राऊत
पुणे : लसीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी जाहीर केलेल्या निर्धारित वेळेला, ‘स्लॉट’ उघडतात आणि क्षणार्धात ‘फुल’ होतात. यामुळे शासनाचे ‘कोविन पोर्टल’ कोणी हॅक करते का, अन्य पोर्टलवरून ‘कोविन पोर्टल’ला गेल्यास लसीकरणासाठी लागलीच कशी ‘अपॉइंटमेंट’ मिळते अशा शंका निर्माण झाल्या आहेत. याचा तपास करण्याची विनंती पुणे महापालिकेने शहर पोलिसांच्या सायबर सेलकडे केली आहे़
सद्यस्थितीला केंद्र शासनाच्या ‘कोविन पोर्टल’शिवाय अन्य पोर्टल अथवा आयटी विभागातील व्यक्तींकडून स्वयंचलित सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अर्थात ‘बॉट्स’ तयार करून लसीकरणासाठी लागलीच ‘अपॉइंटमेंट’ मिळवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक दररोज महापालिकेने दिलेल्या निर्धारित वेळेत कोविन पोर्टलवर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करून वेळ मिळविण्याचा प्रयत्न करतो़ परंतु त्यांना ‘स्लॉट’ मिळत नाही.
संबंधित नागरिकाला ‘ओटीपी’ येईपर्यंत, काही सेकंदात तो ‘स्लॉट’ भरून गेल्याचे सांगितले जाते. अनेक नागरिकांनी लसीकरण अधिकारी तथा, लसीकरण केंद्रांवरही तक्रारी केल्या. मात्र हे केंद्र शासनाचे पोर्टल आहे. या पोर्टलवर फेरबदल करता येत नाहीत, शहरातील केंद्रांवर शेकड्यांमध्ये लसी येत आहेत. पण लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या ही लाखांत आहे. अशी कारणे देऊन सध्या ‘कोविन पोर्टल’वर नागरिकांची गर्दी खूप असल्याने क्षणार्धात ‘स्लॉट’ बुक होत असल्याचे सांगितले जात होते.
चौकट
सायबर सेल करणार तपास
मात्र, त्याच वेळी काही अन्य अॅप अथवा पोर्टलवरून लसीकरणासाठी वेळ सहज मिळत असल्याचेही निर्दशनास आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी लागलीच पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधून याबाबत शहानिशा करून तपास करावा, अशी मागणी केली आहे.
-----------------------
चौकट
खासगी रुग्णालयातलेही ‘स्लॉट’ लगेच भरतात
केवळ महापालिकेच्याच केंद्रांवरील नव्हे तर शहरातील खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांवरही दुसऱ्या दिवशीसाठी जाहीर केलेल्या लसीकरणाचे स्लॉट आज क्षणार्धात भरत आहेत. यामुळे खाजगी रुग्णालयांनी महापालिकेशी यापूर्वीच संपर्क साधला होता. त्यामुळे या प्रकाराबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागालाही याबाबत कळविण्यात आले आहे़
----------------
चौकट
“लसीकरण नोंदणीकरिता थेट कोविन पोर्टलवर न जाता, अन्य पोर्टल अथवा अॅपच्या माध्यमातून कोविन पोर्टलवर गेल्यास, नागरिकांना लसीकरणासाठी सहज अपॉइंमेंट मिळत असल्याने यंत्रणा अचंबित झाली आहे. ज्याप्रमाणे पूर्वी रेल्वेचे तत्काळ तिकीट काढताना, खाजगी एजंटकडे ते लागलीच मिळायचे व रेल्वेच्या तिकीट खिडकीवर ‘वेटिंग’ यायचे. तसाच प्रकार लसीकरण नोंदणीत झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
--------------------