पुणे: पुणे जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल १ लाख २५ हजार १७० नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाला सुरूवात झाल्यापासूनचा एका दिवसांत झालेल्या लसीकरणाचा हा उच्चांक आहे. ७४९ केंद्रावर हे लसीकरण झाले असून हा वेग जर असाच कायम राहिल्यास लवकरच संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण करता येणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी दिली.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण हे संथ गतीने होत होते. त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले होते. जेष्ठ नागरिक तसेच दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सुचना प्रशासनातर्फे आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या. प्राप्त लसींच्या डोस नुसार जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन केले जात होते.
जिल्ह्यात एकुण ३ हजार ५० लसीकरण केंद्र आहे. मात्र, यातील काहीच केंद्रावर लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी ३ लाख लसींचे डोस आले होते. त्यानुसार लसीकरणाचे नियोजन सुरू होते. शुक्रवारी तब्बल ७४९ केंद्रावर १ लाख २५ हजार १७० जणांना लस देण्यात आली. ही संख्या आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. हा वेग कायम राहिल्यास लवकरच लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. मात्र, त्या पद्धतीने लसींचा पुरवठा होणे गरजेचं आहे. असे येडके म्हणाले.