लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील लसीकरण मोहिमेत खाजगी रूग्णालयांतील लसीकरण सध्या जोमात सुरू असून, २१ मे पासून २० जुलैपर्यंत खाजगी रूग्णालयांमध्ये सरकारी रूग्णालयांपेक्षा तीन लाखाने अधिक लसीकरण झाले आहे़ यामध्ये स्पुटनिक लस ८ हजार ७१६ जणांनी घेतली आहे़
पुणे महापालिकेच्या विविध केंद्रांव्दारे होणाऱ्या मोफत लसीकरणाचे नियोजन हे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लसींवर अवलंबून आहे. मात्र शासनाकडून सातत्याने अपेक्षित लस महापालिकेला प्राप्त होत नाहीत. आल्या तरी त्या अनेकदा तुटपुंज्या असतात. त्यातच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी लसीकरण बंद राहते. परिणामी महापालिकेच्या केंद्रांव्दारे होणारे लसीकरण नेहमीच विस्कळीत राहते.
दरम्यान खाजगी रूग्णालयांमध्ये २१ मे पासून लसीकरण सुरू झाल्याने, शहरातील लसीकरण मोहिमेने मोठा वेग धरला आहे. मोफत लसीपेक्षा पैसे देऊन लस आपल्या सोयीप्रमाणे मिळत असल्याने अनेकांनी खाजगी लसीकरण केंद्रांना आता पसंती देण्यास सुरूवात केली़ यामुळे २१ मे ते २० जुलैपर्यंत शहरातील खाजगी रूग्णालयांव्दारे ७ लाख ३८ हजार ९२९ कोव्हिशिल्ड आणि ३७ हजार ४५५ कोव्हॅक्सिन तर ८ हजार ७१६ स्पुटनिक लस दिली गेली आहे़ तर याच कालावधीत महापालिकेच्या व इतर सरकारी रूग्णालयातून पुणे महापालिका हद्दीत ४ लाख ४१ हजार १३९ कोव्हिशिल्ड आणि ३९ हजार ९४३ कोव्हॅक्सिन लस दिली गेली आहे.