पुणे : महापालिका व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अँग्रीकलचरने (एमसीसीआयए) रिक्षाचालकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत अनेक चालकांचे लसीकरण करण्यात आले. रिक्षा पंचायतीचे यासाठी सहकार्य होत आहे.
कमला नेहरू (मंगळवार पेठ), अण्णासाहेब मगर (हडपसर), जयाबाई सुतार दवाखाना (कोथरूड), राजीव गांधी हॉस्पिटल (येरवडा), मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल (धायरी) या महापालिकेच्या ५ व कमला नेहरू उद्यानजवळचे जोशी हॉस्पिटल अशा ६ हॉस्पिटलमध्ये रिक्षाचालकांसाठी लसीकरण व्यवस्था करण्यात आली आहे.
जोशी हॉस्पिटलमध्ये पत्नीलाही लस देण्यात येईल. थेट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर किंवा रिक्षा पंचायत कार्यालयाकडून चिठ्ठी नेल्यानंतर रिक्षा चालकांना लस देण्यात येईल, अशी माहिती पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली. यात संबंधितांच्या सहकार्यामुळे रिक्षाचालकांना विनामूल्य व प्राधान्याने लस मिळत आहे, त्यातून शहरातील अनेक रिक्षाचालकांचे सहज लसीकरण शक्य झाले, असे पवार म्हणाले.