पुणे : लसीकरणासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या ''कोव्हीशिल्ड'' लसींचा साठा कमी पडल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त लसी मागविण्यात आल्या. परंतु, शासनाकडून ''को-व्हॅक्सिन''चा ५० हजार लसींचा साठा पाठविण्यात आला. त्यामुळे सोमवारी लसीकरण केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. शिल्लक असलेल्या कोव्हीशिल्ड दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याने नागरिकांना लस देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेकडो नागरिकांना परत पाठविण्यात आले. यावेळी चिडलेल्या नागरिकांचे लसीकरण केंद्रांवर वादही झाले.
मागील आठवड्यापासून पालिकेला लसी कमी पडत आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तात्पुरत्या १५ हजार लास घेण्यात आल्या. पालिकेने शासनाकडे पुरेशा लसी देण्याची मागणी केलेली आहे. परंतु, शासनाकडून अद्याप लास मिळालेली नाही. कोव्हीशिल्ड लसीचा साठा कमी पडत असल्याने दुसऱ्या डोससाठी हा साठा राखीव ठेवण्यात आला.
पालिकेला शासनाकडून सोमवारी ५० हजार कोव्हॅक्सिन लसी पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हीच लस नागरिकांना देण्याच्या सूचना सर्व केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या. कोविन प्रणालीमध्ये यापूर्वी कोव्हीशिल्डची साईट तयार करण्यात आली होती. आता त्यामध्ये बदल करून कोव्हक्सीनची साईट तयार करण्यात सोमवारी वेळ गेला. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दोन्ही लसी आल्याने गडबड व्हायला नको म्हणून काही रुग्णालयांनी लसीकरण थांबवले होते. तर काही रुग्णालयांत १०० नागरिकांनाच लस देऊन बाकीच्यांना परत घरी पाठविण्यात आले.
-------
शासनाकडून आणखी साठा येणार
ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्याकरिता कोव्हीशिल्डचा साठा ठेवण्यात आला आहे. शासनाकडून आणखी ५० हजार कोव्हीशिल्ड पालिकेला मंगळवारी किंवा बुधवारी मिळणार आहेत. ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
-------
कोव्हिशिल्डचा शिल्लक साठा हा पुर्णपणे दुसऱ्या डोससाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर , नव्याने नोंदणी केलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन दिले जाणार आहे. याबाबत ससूनसह सर्व रुग्णालयांना पत्र दिले जाणार आहे. शहरात लसीकरण सुरळीत सुरू होते. सिस्टीममध्ये सुधारणा करताना वेळ गेला. कमला नेहरू आणि ससून रुग्णालयात मात्र दोन्ही लसी दिल्या जाणार आहेत.
- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका
-------
८५ केंद्रांवर लसीकरण सुरू
शहरात आजमितीस ८५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये आणखी ९ खासगी रुग्णालयायांची भर पडणार आहे. या रुग्णालयांमध्ये केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून पालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लसीकरण केंद्रांची संख्या ९४ होणार आहे. दरम्यान, पालिकेला मिळालेल्या ५० हजार कोव्हॅक्सिन लसी आगामी तीनच दिवस पुरणार आहेत.
--------
* शासनाकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ५० हजार कोव्हक्सीन पाठविण्यात आले.
* कोव्हीशिल्ड फक्त दुसऱ्या डोससाठी वापरणार, आणखी ५० हजार कोव्हीशिल्ड मिळणार
* दररोज सरासरी १५ हजार नागरिकांना लसीकरण