लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात तब्बल ७२ लाखांपेक्षा अधिक लोकांचे कोरोना लसीकरण झाले असले तरी यामध्ये विशेष गटातील लोकांच्या लसीकरणांचा वेग कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विशेष गटातील ५ लाख ९ हजार ८८० लोकांचे लसीकरण झाले असून, यामध्ये साडेतीन लाखांपेक्षा लसीकरण हे फक्त औद्योगिक क्षेत्रातील आहे. यामध्ये दिव्यांग, गरोदर माता, तृतीयपंथीयांचे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गेल्या एक-दीड महिन्यांपासून लसीकरणाचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ७२ लाखपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. तर प्रशासनाच्या वतीने विशेष गटातील लोकांसाठी नियमित लसीकरणासह स्वतंत्र मोहीम स्वरूपात देखील लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग, गरोदर माता आणि तृतीयपंथीय लोकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. तर औद्योगिक क्षेत्रात बहुतेक सर्व खाजगी कंपन्यांनी पुढाकार घेऊन आपले कर्मचारी व कामगारांचे लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. यामुळेच औद्योगिक क्षेत्रातील ३ लाख ९ हजार ८८० लोकांचे लसीकरण झाले. अद्यापही हजारो कामगार लसीकरणापासून वंचित आहेत. तर गरोदर मातांच्या लसीकरणाला ९ जुलैपासून सुरूवात झाली असून, आतापर्यंत १ हजार ४६० गरोदर मातांना कोरोना लस टोचण्यात आली. तर २२ हजार ४५ दिव्यांग लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण बंधनकारक असून, आतापर्यंत ९ हजार ६९५ विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
समाजातील सर्वात उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीय लोकांच्या लसीकरणासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र कॅम्प घेऊन लसीकरण करण्यात आले. यामुळेच आता पर्यंत ५७० तृतीयपंथीयांचे लसीकरण झाले आहे. परंतु ही संख्या खूपच कमी असून अधिक वेग देण्याची गरज आहे.
आजारी अंथरुणावर खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांचे लसीकरण देखील घरी जाऊन करण्यात येत असून, आता पर्यंत ९९० लोकांचे लसीकरण झाले आहे.
-----
जिल्ह्यात विशेष गटातील लसीकरण
औद्योगिक क्षेत्रातील : ३०९९८०
दिव्यांग व्यक्ती : २२०४५
परदेशात जाणारे विद्यार्थी : ९६९५
गरोदर माता : १४६०
बेड रिडन लोक : ९९०
तृतीयपंथीय : ५७०
इतर : २०५८१५
एकूण : ५५०४५५
-------