लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या दोन दिवसांपासून लसींचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे येथील लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांना लस न घेतातच केंद्रावरून माघारी जावे लागत आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ पेक्षा अधिक वय असलेल्या सर्वच नागरिकांसाठी मोफत कोविड लसीकरणास शनिवारपासून (दि. १९ जून) सुरुवात करण्यात आली होती. लसीची उपलब्धतेनुसार, दि. २०, २१, २२, २३, २४, २५ सलग सात दिवस लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने राबविण्यात आली. दि.२६, २७ (शनिवार, रविवार) दोन दिवस आरोग्य केंद्रात लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. यानंतर सोमवारी (दि. २८) फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू ठेवण्यात आले. मात्र सोमवारनंतर शुक्रवार (दि.२ जुलै) पर्यंत अजून नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात, लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण होऊ शकले नाही.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गुळुंचे, कर्नलवाडी, मांडकी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी आदी गावे येतात, तर बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी आदी गावांतील लोक लसीकरणासाठी येथे येत आहेत.
१८ वर्षांपुढील तरुण पिढीने सगळ्याच लसीकरण केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली होती. पहाटे लवकरच आरोग्य केंद्रांवर लोक रांगा लावून उभे होते. पहिली लस घेतलेल्या नागरिकांचा ८४ दिवसांचा कालावधी संपल्याने दुसऱ्या डोससाठी त्यांनीही रांगा लावल्या होत्या. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे मागील चार दिवसांपासून आरोग्य केंद्र ओस पडू लागली आहेत.
चौकट
"दररोज सकाळपासूनच अनेक नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येऊन लसीकरणासंदर्भात विचारणा करतात. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे असून, हे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. बारामतीच्या पश्चिम भागाला लागून भाग आहे. त्या परिसरातील लोकांचा नीरेतच राबता असतो. त्यामुळे ते लसीकरणासाठी नीरेतच येते. गावखेड्यातील लोक गाडीच्या उपलब्धतेनुसार येतात, तर सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य केंद्रात येऊन लसीकरणाशिवाय परत जावे लागत आहे.
- शिवाजी चव्हाण, आरोग्यसेवक
कोट
लसीकरणासाठी उपलब्ध लस, मिळणारी लस यावर लसीकरण अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये एका दिवसात १ लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे. दोन्ही महानगरपालिका आणि ग्रामीण भागात मिळून ६३० पेक्षा जास्त साईड तयार केल्या असून, मागील आठवड्यात एकाच दिवशी एक लाख चाळीस हजार नागरिकांना लसीकरण केले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याठी योग्य प्रमाणात लसीची उपलब्धता होणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.
फोटोओळ- लसीकरणासाठी लस उपलब्ध नसल्याने नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर ओस.