लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातून कोरोना हद्दपार करण्यासाठी केंद्र शासनाने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 20 लाख लोकांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत पुण्यासाठी अपेक्षित लसींचे डोस उपलब्ध होत नसल्याने बहुतेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे.
जिल्ह्यात 45 वर्षांवरील सुमारे 30 लाख लोकसंख्या असून, आतापर्यंत तब्बल 20 लाख 4 हजर 473 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात 60 वर्षांवरील सुमारे 70 टक्के, तर 45 ते 59 वर्षांवरील सुमारे 40 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या व लसीकरणाची त्या जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन दर आठवड्याला लसींचे डोस वाटप केले जातात. पुण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार हे डोस उपलब्ध होतात. साधारण दर आठवड्याला सरासरी दीड लाख डोस पुण्यासाठी वाटप केले जात होते. यामुळेच आतापर्यंत 20 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता जर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी दिवसाला तब्बल 60 हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, पण लसींचे डोस उपलब्ध न झाल्यास हे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण होणार आहे.
-------
- जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रे : 670
- सध्या सुरू असलेले केंद्र : 469
- दररोज किती जणांना लस देण्याचे टार्गेट : 60,000
- प्रत्यक्षात किती जणांना दिली जाती लस : उद्दिष्टाच्या 70-80 टक्के
----------
- जिल्ह्यात आतापर्यंत एकूण लसीकरण : 20,04,473
- पहिला डोस घेतलेले लोक : 17,30,488
- दुसरा डोस घेतलेले लोक : 2,73,985
-----------
केंद्र शासनाने 1 मेनंतर 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सध्या पुणे शहर आणि ग्रामीण भागात 670 लसीकरण केंद्र सज्ज आहेत. परंतु यासाठी दररोज शासनाकडून लसींचे किती डोस उपलब्ध होणार, निश्चित झालेले नाही. सध्या दररोज तब्बल 60 हजार लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भविष्यात अधिकची लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या वाढ देखील करण्यात येईल.