पुणे : कमला नेहरू रुग्णालयात ‘भारत माता की जय’च्या जयघोषात लसीकरणाला सुरुवात झाली. लस घेणारे ७४ वर्षांचे डॉ.विनोद शहा हे पहिले लाभार्थी ठरले. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांनी लस घ्यावी, असा संदेश यावेळी त्यांनी दिला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कमला नेहरू रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे उदघाटन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त डॉ.विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, नगरसेवक हेमंत रासने, गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी डॉ.विनोद शहा यांच्या समवेत बालरोगतज्ज्ञ डॉ.किरण महंकाळे आणि डॉ.नितीन अभ्यंकर यांना लस देण्यात आली. अतिशय उत्साही वातावरणात मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर लसीकरण केंद्र तयार करण्यात आले होते.
केंद्राच्या प्रवेशद्वारापासून कक्षापर्यंत रांगोळी काढण्यात आली. त्याचबरोबर, सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते. लसीकरण मोहिमेत नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांसाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. महिला आणि पुरुषांसाठी निरीक्षण कक्ष उभारण्यात आले. या कक्षात लसीकरणासाठी एका आरोग्य सेवकाला प्रवेश दिला जात होता. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास निरीक्षण कक्षात बसविले जात होते.
“नागरिकांनी लस घेण्याबाबत मनात कुठलीही शंका बाळगू नये. लस घेऊन लवकरात लवकर सर्वांनी देश सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू. लसीचे दुष्परिणाम गंभीर नसतात. माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत लसीचे दुष्परिणाम बघितले नाहीत. त्यामुळे सकारात्मक विचाराने लस घ्या,” असे लस घेतलेल्या डॉ.नितीन अभ्यंकर यांनी सांगितले.
चौकट
विनामास्क ‘माननीय’
कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी लसीची वाट जग पाहात होते. त्याच्या लशीची वाट जगाने अकरा महिने पाहिली. त्यानंतर, कोरोना लस आली. मात्र, लसीकरणाच्या या पहिल्या सोहळ्याला काही राजकीय पक्षाच्या ‘माननीयां’नी मास्क घालण्याचे भान पाळले नाही. अखेरीस रुग्णालयातील परिचारिकांनी त्यांना मास्क दिले.
चौकट
आहारावर लक्ष, वेळेत औषधे
“जगभरातला वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस आली आहे. त्याचा लाभ जास्तीतजास्त लोकांनी कुठलीही भीती न बाळगता घ्यावी. मला स्वत:ला मधुमेह, अस्थमा असे इतर आजार आहेत, तरीही लस घेतल्यावर खास खबरदारी घेण्याची गरज नाही. आहारावर लक्ष देणे, भरपूर पाणी पिणे, ताप आल्यावर औषधे घेणे या गोष्टी कराव्यात.”
-डॉ. विनोद शहा.
चौकट
कमला नेहरू असणार केंद्र
“लसीकरणात दहा-दहाच्या टप्प्याने लस देण्यात येणार आहे. इमर्जन्सीसाठी सर्वकाही नियोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार औषधे, तसेच दोन एमबीबीएस आणि एक फिजिशियन डॉक्टर यांच्या निरीक्षणात लस घेणारे आरोग्यसेवक ठेवण्यात आले आहेत.”
-डॉ लता त्रिंबके, केंद्रप्रमुख, कमला नेहरू रुग्णालय
चौकट
पुण्यासाठी अभिमानाचा क्षण
“कोरोनाचा सामना करताना, आजचा दिवस पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘सिरम’च्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यात झाले. ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्याच पार्श्वभूमीवर लसीकरणाची सुरुवात हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
-मुरलीधर मोहोळ, महापौर