सुरुवातीपासूनच या मोहिमेला कॅम्प भागातील नागरिक अत्यंत अल्प प्रतिसाद देत होते. त्यामुळे येथील डॉक्टर्स, माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी अक्षरशः नागरिकांना फोन करत लसीकरणासाठी साकडे घातल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लसीकरणाची गर्दी वाढत चालल्याचे सकारात्मक दिसून येत होते. यात २० एप्रिलपर्यंत एकूण सात हजार लोकांचे लसीकरण करून घेण्यात कॅन्टोन्मेंट प्रशासन यशस्वी झाले आहे.
परंतु आज सकाळी सुरू झालेले लसीकरण दुपारनंतर मात्र थांबल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अधिक माहिती घेतली असता कळले की, कॅन्टोन्मेंट बोर्डाला लसीचा पुरवठा करणारे पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडेच लसीचा साठा आलेला नाही. त्यामुळे हा गोंधळ उडाला आहे.
याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथील अधिकारी असलेले डॉ. भगवान पवार यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकलेले नाही.