पुणे : पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण प्राधान्याने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़ शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जात असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशात निश्चित झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ‘लसीकरण ड्राइव्ह’ राबविण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात हा विशेष ड्राइव्ह राबविण्यात येत असून, नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पद्धतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण येथे केले जाणार आहे. यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून, सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक राहणार आहे़
-------------
आठवडाभर मोहीम राबवणार
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक राहिली तर, हा ‘लसीकरण ड्राइव्ह’ संपूर्ण आठवडाभर राबवण्याची महापालिकेची तयारी आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करू नये. प्रवेश निश्चित होऊनही, केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होणार नाही, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले़
----------------------