पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:42 PM2021-08-27T21:42:35+5:302021-08-27T21:43:17+5:30
गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका: अजित पवार
पुणे : राज्यात सध्या तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नसला तरी पालक आणि संस्था चालक यासाठी आग्रही आहेत. यामुळेच भविष्यात शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खाजगी व सरकारी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान जगभरात दररोज पाच-सहा लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहे. ही तिस-या लाटेची घंटा असू शकते, त्यामुळे नागरिकांना गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका, असा इशारा देखील पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.27 ) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण,
आमदार चेतन तुपे, संजय जगताप, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी सांगितले, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवून देखील रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. ही बाब चांगली असली तरी नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या सणानिमित्त गर्दी करू नये . सणासुदी निमित्त संसर्ग वाढू नये यांची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे विभागातील गणेशोत्सवा निमित्त काय उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पोलिस यंत्रणेसोबत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे पवार यांनी सांगितले.
-------
सीएसआरमधून पुणे जिल्ह्याला दीड लाख डोस
गेल्या दीड- दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या 31 ऑगस्टला बजाज कंपनीकडून पुणे जिल्हयासाठी तब्बल 1 लाख 35 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन सीएसआर मधून लसीकरण सुरू केले आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल असे पवार यांनी स्पष्ट केले.
------
एस.टी कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलू नये
पगार होत नसल्याने एका एस.टी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याबाबत पवार यांनी सांगितले कोरोनामुळे एस.टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी राज्य शासनाकडून सर्व मदत करण्यात येत आहे. शासनाने कर्मचा-यांचे पगार करण्यासाठी 500 कोटी रुपये दिले आहेत. लवकरच आणखी निधी देण्यात येईल. पगार उशीरा होतील, पण नक्की होतील यामुळेच कोणी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.