कुरकुंभ केंद्रावर लसीकरणासाठी पुणे व शहर परिसरातील नागरिकांच्या वाढत्या गर्दीने कुरकुंभ ग्रामस्थांना संभ्रमात टाकले होते. स्थानिक ग्रामस्थांना लस मिळत नसल्याच्या आरोपावरून आरोग्य केंद्रात काही काळ गोंधळ उडाला. यातच काही नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्याने कुरकुंभ केंद्राची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र नंतर सरपंच राहुल भोसले यांच्या प्रयत्नाने ह्या केंद्रावर पुन्हा लसीकरण सुविधा सुरू करण्यात आली. मात्र कुरकुंभ व देऊळगावराजे अश्या दोन ठिकाणी विभागून लसीकरण करण्यात येणार आहे.त्यामुळे कुरकुंभ केंद्रावर आठवड्यात फक्त तीनच दिवस लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, कुरकुंभ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सनी सोनार यांनी सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत लस देण्याबाबत प्रस्ताव मांडला, याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहीती व शासकीय परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना सरपंच राहुल भोसले यांनी केल्या आहेत. तसेच कोरोनाची चाचणी केंद्र देखील सुरू करण्यावर प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कुरकुंभ केंद्रावर फक्त शंभर लस उपलब्ध होत असल्याने लसीकरणाची ऑनलाइन प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होऊन जाते व नंतर हे अॅप्लिकेशन बंद पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मनस्ताप होत आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातच लसीकरणासाठी येणाऱ्या अडचणीमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत.
लसीकरण होणार सोपे
ग्रामीण भागात लसीकरण नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ग्रामपंचायत कुरकुंभने ग्रामस्थांना मोफत लस उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबत विचार केला आहे. याबाबत सर्व माहिती व परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून ग्रामस्थांना सहज लस उपलब्ध करून देता येईल.
राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ