पुणे : पुण्याला लसींचा साठाच न मिळाल्याने शनिवार-रविवार ठप्प असलेले लसीकरण सोमवारी (दि.१०) सुरू होणार आहे. लसींचा साठा मिळाल्याने लसीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाने रविवारी दिली.
पालिकेने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले आहे. यात २ केंद्रांवर कोविशिल्ड, तर ४ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली आहे. अपॉइंटमेंट/स्लॉट बुकिंगची सुविधा रात्री ८ वाजता सुरू झाली होती. केवळ बुकिंग असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जाणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
यासोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १११ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात १०१ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १० केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोव्हॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या १० केंद्रांवर १२ एप्रिल २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हिशिल्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर २२ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.