लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील मागील दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण रविवारी सुरू होणार आहे. पालिकेला १३ हजार लसी प्राप्त झाल्या असून, शहरातील ६४ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसी दिल्या जाणार आहेत. यामध्ये पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार असून, ४५ वर्षांपुढील फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर यांच्यासाठी २० लस राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे.
महापालिकेला प्राप्त झालेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या तेरा हजार डोसपैकी ६० टक्के लसी या ४५ वर्षांपुढील ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के लसी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी ६४ केंद्र निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस पाठविण्यात येणार आहेत. लसीकरणासाठीचे ऑनलाईन बुकिंग (स्लॉट) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे़
-----
कोव्हॅक्सिन लस नाही
महापालिकेला फक्त कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला आहे. कोव्हॅक्सिन लसींचा साठा न मिळल्याने ही लस घेतलेल्यांना दुसरा डोस रविवारी मिळणार नाही. त्यामुळे फक्त कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे.
----
खासगी रुग्णालयात झाले लसीकरण
शहरात शासकीय यंत्रणांना लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद असतानाच दुसरीकडे शहरातील चार ते पाच खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लसीकरण झाले. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवसभरात ६८१ नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात पैसे भरून लस घेता येते. त्यामुळे नागरिक त्या ठिकाणी जाऊन लस घेत आहेत. त्यासाठी शनिवारी रांग लागल्याचे दिसून आले.