नीरा : रक्षाबंधनानिमित्ताने पुरंदर तालुक्यातील विविध लासीकरण केंद्रावर फक्त महिलांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वय वर्ष १८ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या तरुणी व महिलांना कोविशिल्ड लस देण्यात आली. पुरंदरमधील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार ९५ महिलांचे लसीकरण करण्यात आले.
पुरंदर तालुका आरोग्य प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त कोविड लसीकरण व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. अगदी उपकेंद्रावर ही आता लस उपलब्ध केली जाते. तर काही गावांत विविध सामाजिक संघटनांची मदत घेत संपूर्ण गावाची लसीकरण मोहीमही राबवण्यात आली आहे. त्याचबरोबर या लसीकरणात महिलांचे प्रमाण कमी असल्याने महिलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आज तालुक्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
तालुक्यातील भावांनी आपल्या बहिणीचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला जाधव यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील १ हजार ९५ महिलांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिला डोस १०२, वाल्हे केंद्रात पहिला डोस १३४, तर दुसरा डोस ५ असे १३९ महिलांना लस देण्यात आली. परिंचे केंद्रात पहिला डोस १९९, तर दुसरा डोस ९ असे २०८ महिलांना लस देण्यात आली. माळशिरस केंद्रात पहिला डोस ४०२, तर दुसरा डोस ९६, असे एकुण ४९८ महिलांना लस देण्यात आली. बेलसर केंद्रात पहिला डोस १३३ तर दुसरा डोस १५ असे १४८ महिलांना लस देण्यात आली. पुरंदर तालुक्यातील एकूण १ हजार ९५ महिलांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे. महिलांमध्ये लसीकरण बाबत जनजागृती व्हावी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
---
फोटो क्रमांक: २४नीरा लसीकरण
फोटो ओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त महिलांसाठी आयोजित लसीकरण मोहिमेत लसीकरण करण्यासाठी जमलेल्या महिला.