देशभरात लसोत्सवाला सुरुवात झाली तरी पुणेकरांना मात्र लसीकरण करुन घेण्यासाठी वाटच पहावी लागेल अशी चिन्ह आहेत. पुण्यातल्या अनेक लसीकरण केंद्रावर जितकी लस उपलब्ध तितकेच लसीकरण करुन उरलेल्या लोकांना परत पाठवले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासुन पुणे शहरांमध्ये लसींच्या उपलब्धतेचा निर्माण झालेला प्रश्न अजुनही सुटायला तयार नाहीये. लसीकरणासाठी वॅाक इन या आणि लसीकरण करुन जा असं प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती केंद्रावर दिसत नाहीये. अनेक केंद्रावर नागरिकांना परत पाठवण्याची वेळ येत आहे.
काही ठिकाणी तर केंद्र सुरुच करता आलं नसल्याची परिस्थितीही पहायला मिळाली. पुर्वी जिथे दिवसाकाठी ३०० लसी दिल्या जायच्या तिथे कसंबसं १०० जणांना लस देउन घरी पाठवलं जात आहे.
लोकमतशी बोलताना एका केंद्रावरील डॅाक्टर म्हणाल्या “ पुर्वी आम्हांला जितके शक्य तितके लसीकरण करण्यास परवानगी होती. आता मात्र ही संख्या कमी झाली आहे. आधी दररोजचे ३५० च्या वर लसीकरण होत होतं. आता मात्र आम्हांला जेवढ्या लसी मिळतील तितकेच लसीकरण करावे लागत आहे. दररोज दोन तीन तास लसीकरण होतंय. नंतर बंद”
बऱ्याच केंद्रावर तर लसीकरण सुरुच झालं नाही. रांगा लावुन थांबलेल्या नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. एकुणच काय तर पुण्यात लसी शिवायचाच लसोत्सव आहे हेच यावरुन स्पष्ट होते आहे.