पुण्यामध्ये पुन्हा एकदा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. दीड ते दोन दिवस पुरेल इतक्याच लसी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पुणे शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरण वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासुन केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र पुरेशा लसी उपलब्ध होतच नाहीयेत असं चित्र दिसत आहेत.
आजच्या आकडेवारीनुसार पुणे महापालिकेकडे फक्त १५० लसी शिल्लक आहेत. तर कोव्हीशिल्ड चे ३२००० डोस हे वाटलेले आहेत. याशिवाय काही प्रमाणात कोव्हॅक्सिन देखील शिल्लक आहे. मात्र कोव्हॅक्सीन चे डोस हे प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी वापरले जात आहेत. शहरातले एकुण दररोजचे लसीकरण पाहता या लसी साधारण दीड दिवस पुरतील. मात्र नव्याने येणाऱ्या साठ्याबाबत अजुन काहीही स्पष्ट झालेले नाहीये. त्यामुळे आज शहरातली अनेक केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली होती.
नवी केंद्र सुरु करायची कशी ?
सध्या संपुर्ण शहरात लसीकरणाची एकुण १६० लसीकरण केंद्र सुरु आहेत. याशिवाय नव्याने केंद्र सुरु करण्याची तयारी अनेक खासगी रुग्णालयांकडुन झाली आहे। महापालिकेच्या देखील नव्या जागा तयार आहेत. पण लसी उपलब्ध होत नसेल तर ही केंद्र सुरु करायची कशी असा प्रश्न सध्या अधिकाऱ्यांना पडला आहे.