पुणे : देशात विविध आजारांशी संबंधित तयार होणाऱ्या लसींचे मुल्यमापन, चाचणी घेण्यासाठी परदेशात जावे लागते. पण आता नोव्हेट इन इंडिया या उपक्रमांतर्गत ही चाचणी पुण्यातील प्रयोगशाळेत केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या मदतीने भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयामध्ये त्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी केली जाईल. ही भारतातील पहिली लस चाचणी प्रयोगशाळा असल्याचा दावा कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केला आहे.विविध आजारांचा प्रसार टाळण्यासाठी शासकीय तसेच खासगी संशोधन संस्थांकडून लसी विकसित केल्या जातात. पण या लसींचे मुल्यमापन करणे, चाचणी घेणे, त्याची योग्यता निश्चित करणारी यंत्रणा देशात उपलब्ध नाही. त्यामुळे या लसी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून प्रमाणित केल्या जातात. यामध्ये खुप वेळ आणि पैसाही खर्ची पडतो. तसेच देशांतर्गत संशोधनालाही चालना मिळत नाही. यापार्श्वभुमीवर ह्यइनोव्हेट इन इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत भारती विद्यापीठातील इंटर अॅक्टीव्ह रिसर्च स्कुल फॉर हेल्थ अफेअर्स (ईर्षा) या संशोधन संस्थेच्या मदतीने नॅशनल सेंटर फॉर इम्युनोजेनिसिटी इव्हॅल्युएशन(एनसीआई) ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.या प्रयोगशाळेसाठी केंद्र सरकारने विद्यापीठाला १६.४ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. तर विद्यापीठाकडून ३.५ कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाईल. पुढील सहा महिन्यांमध्ये विद्यापीठाच्या धनकवडी येथील आवारात प्रयोगशाळा सज्ज होईल. त्यानंतर सर्व प्रकारच्या लसींचे मुल्यमापन करता येणार आहे. या चाचण्यांसाठी काही कंपन्यांनी विद्यापीठाशी करारही केले आहेत. विद्यापीठासह एकुण चार संस्थांची केंद्र शासनाने निवड केली होती. या संस्थांची पाहणी केल्यानंतर शासनाने विद्यापीठाला हिरवा कंदील दाखविला. देशातील ही पहिली प्रयोगशाळा असणार आहे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
पुण्यात होणार विविध आजारांशी संबंधित लसींची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 5:28 PM
लसींचे मुल्यमापन करणे, चाचणी घेणे, त्याची योग्यता निश्चित करणारी यंत्रणा देशात उपलब्ध नाही. त्यामुळे या लसी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून प्रमाणित केल्या जातात.
ठळक मुद्देया प्रयोगशाळेसाठी केंद्र सरकारने विद्यापीठाला दिले १६.४ कोटी रुपयांचे अनुदान पुढील सहा महिन्यांमध्ये विद्यापीठाच्या धनकवडी येथील आवारात प्रयोगशाळा सज्ज