अमेरीकन नोव्हाव्हॅक्स कंपनीने भारतात सिरमच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन तसेच रशियाच्या स्पुटनिक लसींच्या वढु बुद्रुक येथे केईएम रिसर्च सेंटरमधील लस चाचणी व संशोधन प्रकल्पाची पाहणी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदार अॅड. अशोक पवार यांच्यासमवेत केली. यावेळी केईएम रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. लैला गार्डा, प्रकल्प प्रमुख डॉ. संजय जुवेकर, अभ्यास संशोधक डॉ. आनंद कवडे तसेच व्यवस्थापक डॉ. गिरीश दायमा यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. याबाबत खासदार डॉ. कोल्हे तसेच आमदार ॲड. पवार यांनी समाधान व्यक्त करुन या प्रकल्पाला शक्य त्या पाठबळाची ग्वाही दिली.
डॉ.आनंद कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्यातील चाचण्यांपैकी भारतात सध्या सहा ठिकाणी १६०० जणांवर लसीच्या परिणामतेची चाचणी होत आहे. यात कालपासून वढु येथे सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात १८ वर्षावरील वैद्यकीयदृष्ट्या पात्र १०० लोकांवर या लसीची चाचणी होणार आहे. यात तीन आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाणार असून सहा महिने लसधारकांची पाहणी केली जाणार आहे.
वढूतील केईएम मध्ये अनेक लसींचे संशोधन सुरु
कोविडवरील स्पुटनिक या रशियन लसीची चाचणी सुरु असून, ६ रोगांवरील हेक्सा तसेच आर-बीसीजी, क्यु- एचपीव्ही (गर्भाशय मुखाचा कॅन्सर) यावरील लसींचीही चाचणी व संशोधन तसेच कोविड सिरो सर्वेक्षणही येथे सुरु आहे. तर लहान मुलांवरील न्युमो कोकल लसीची चाचणीही पूर्ण झाली असून त्याचा अभ्यास सुरु असल्याचे अभ्यास संशोधक डॉ. आनंद कवडे यांनी सांगितले.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरुर) येथील केईएम रिसर्च सेंटरमधील लस चाचणी व संशोधन प्रकल्पाची पाहणी करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे समवेत आमदार अॅड. अशोक पवार