लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राज्य सरकारच्या कोरोना लसीकरणाला गती यावी यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला वातानुकूलित ‘व्हॅक्सिन व्हॅन’ भेट दिली. ३२ क्युबिक मीटर क्षमतेच्या या व्हॅनमधून एकावेळी लशींचे ३० लाख डोस घेऊन जाता येतील. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. ही व्हॅन विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात लशींचा पुरवठा करेल,” अशी माहिती एचपीसीएलचे पुणे महाप्रबंधक (जनसंपर्क) डॉ. पंकज शर्मा यांनी दिली.
यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक (परिवहन आरोग्य सेवा) मिलिंद मोरे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. सचिन देसाई, युनिसेफ लसीकरण सल्लागार डॉ. सतीश डोईफोडे, ‘एचपीएमडीआय’चे प्राचार्य प्रवीण कुमार, ‘एचपीसीएल’ पुणेचे वरिष्ठ क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे, मानव संसाधन विभागाचे सहायक प्रबंधक अंकुर पारे, शीला रवीकुमार आदी उपस्थित होते.
या वातानुकूलित ट्रकची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे प्रवीण कुमार यांनी सांगितले. डॉ. दिलीप पाटील म्हणाले की, “लसीचे पुरवठादार व लाभार्थी यातील शीतसाखळी संतुलित ठेवणे महत्त्वाचे असते. ‘एचपीसीएल’च्या या उपक्रमामुळे लशीकरण मोहिमेस बळ मिळेल. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपासून सर्वाना लस दिली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात लसीची वाहतूक करावी लागणार आहे. अशावेळी ही व्हॅक्सिन व्हॅन उपयुक्त ठरेल. कोरोना लसीनंतर भविष्यात इतर प्रकारच्या लसीच्या वाहतुकीलाही याचा लाभ होईल.”