पुणे : शहरात ३० मे पासून १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला आलेल्या पाच हजार डोस वगळता, अन्य वर्गासाठी लस महापालिकेकडे प्राप्त झाल्या नव्हत्या़ मात्र लसीची ही प्रतीक्षा आता संपली असून, मंगळवारी महापालिकेला ३० हजार डोस प्राप्त झाले आहेत़ पण या लस एक दिवस तरी पुरतील का अशी शंका आहे़
महापालिकेकडे प्राप्त झालेल्या एकूण डोसपैकी १० हजार कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगटातील पहिल्या डोसकरिता व यापूर्वी ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला आहे, त्यांनाच दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे़ १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला हा डोस अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर, लायगुडे रुग्णालय सिंहगड रोड व सुतार दवाखाना कोथरूड येथे दिले जाणार आहेत़ मात्र याकरिता कोविन अॅपवरील नोंदणी आवश्यक आहे़ तर महापालिकेकडून यापूर्वी ज्या १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते, त्या ठिकाणीच कोव्हॅक्सिनचे दुसरे डोस उद्या दिले जाणार आहेत़ अन्य ठिकाणी कोव्हॅक्सिनचे हे डोस उपलब्ध राहणार नाहीत़
दरम्यान, २० हजार कोव्हिशिल्ड लसचे वितरण शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर केले गेले असून, हे वितरण करतानाच, संबंधित लसीकरण केंद्रांना या लसीचा वापर केवळ ४५ वर्षांवरील वर्गाला दुसऱ्या डोससाठी करावा, असेही महापालिकेने कळविले आहे़ त्यामुळे नव्याने कोणासही लसीचा पहिला डोस मिळणार नसून, नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर पहिला डोस घेण्यासाठी सध्या तरी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे़
-------------------------
कमला नेहरू व राजीव गांधी येथे लसीकरण सुरू
१८ ते ४४ वयोगटातील वर्गाला कोव्हिशिल्डचे लसीकरणाचे काम उद्याही (दि. ५) कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय येथे सुरू राहणार आहे़ मात्र या ठिकाणी केवळ कोव्हिशिल्ड लस मिळणार आहे़
-----------------------