पुणे : राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधक लस वितरित करताना १० टक्के लसची व्हाईल सील तोडताना तसेच शिल्लक राहिलेली लस लवकर न वापरणे आदी कारणांने वाया जातील असे गृहित धरले आहे. मात्र पुणे शहरात लस वाया जाण्याचे प्रमाण हे केवळ साडेचार टक्क्यांपर्यंतच असल्याचे दिसून आले आहे.
लसीकरण सुरू झाल्यानंतर म्हणजे १६ जानेवारीपासून प्रारंभीच्या काही दिवसांमध्ये लसीकरणास येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे लसची एक व्हाईल फोडली तर त्यातील चार ते पाच डोस हे व्हाईल फोडल्यावर विहित वेळेत दिले न गेल्याने वाया जात होते. परिणामी प्रारंभी लस वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, गेल्या दीड महिन्यापासून लसीच्या एका व्हाईलमधून निश्चित केल्याप्रमाणे १० ते ११ डोस दिले जात आहे. २५ मार्च पर्यंत शहरात ३ लाख लसीचे डोस दिले गेले होते. तर शहरात एका महिन्यात साधारणत: पावणेपाच लाखाने वाढ झाली असून, २५ एप्रिलपर्यंत एकूण ७ लाख ७० हजार ३३३ जणांना लस दिली गेली आहे.
लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने गेल्या दीड महिन्यापासून लस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण प्रारंभीचे लस वाया जाण्याचे जास्तीचे प्रमाण व आत्ताचे कमी प्रमाण याची बेरीज केली तरीही, शहरात आलेल्या एकूण लसीपैकी केवळ साडेचार टक्क्यांपर्यंतच लस वाया गेल्याचे दिसून आले आहे. मात्र सद्य परिस्थितीत लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी दिली.
----------------------------