लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ससून रुग्णालयात कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून, शनिवारी (दि. १६) ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सर्व प्रथम लस घेतली. रविवारपासून दररोज सहाशे व्यक्तींना लस देण्याची व्यवस्था रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यामुळे आठवड्याभरात ससूनमधील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
कोरोना लसीकरणासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते फीत कापून लसीकरणास सुरुवात झाली.
लसीकरणासाठी रुग्णलाय प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. लसीकरण केंद्रासमोर रांगोळी काढण्याबरोबरच लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. यावेळी ससूनमधील सर्व डॉक्टर-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले की, ससून रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी आदी मनुष्यबळ एकूण ४ हजार १५० इतके आहे. या सर्वांना लवकरात लवकर लस देण्यासाठी रविवारपासून पाच नवीन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. रुग्णालयात दररोज ६०० जणांना लस दिली जाईल.
चौकट
लस सुरक्षित
“कोरोना विरोधातील लस सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. मात्र, लस घेतली म्हणून कोरोना होणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नये. शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या आरोग्य विषयक नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे.”
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
चौकट
“पुणे जिल्ह्यात ३१ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले. पुणे शहरात ८, पिंपरी-चिंचवडमध्ये ८ आणि अन्य १३ तालुक्यांमध्ये ही केंद्रे आहेत. जिल्ह्यात लसीकरणाची पूर्णतयारी झाली आहे. प्रत्येक ठिकाणी लसीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.”
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद